पाळधी प्रतिनिधी : शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेनेच्या धरणगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सुनील राजेंद्र बिरले यांची धरणगाव तालुकाध्यक्षपदी, तर मनोज शांताराम महाजन यांची धरणगाव शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष सुमित पाटील व जिल्हा उपाध्यक्ष समाधान वाघ यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हाध्यक्ष सुमित पाटील व राष्ट्रीय उपाध्यक्ष अशपाक शाह यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
शिवशक्ती वाहतूक सेना व कामगार सेना वाहनचालक, वाहनमालक तसेच परिवहन क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत आहे. वाहनचालकांच्या अडचणी, आरटीओशी संबंधित प्रश्न, परवाने, विमा, सुरक्षितता आणि इतर समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
वाहतूक क्षेत्रातील कामगारांना संघटनात्मक पाठबळ देण्यासोबतच त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी सुनील बिरले व मनोज महाजन यांचे अभिनंदन करून पुढील संघटनात्मक व समाजहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास आबा माळी, नवलराजे पाटील, अनिल माळी, भूषण माळी, प्रशांत झंवर, माजी सरपंच अरुण पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



