धरण ७४.४८ टक्क्यांवर; ४९ हजार ५८२ क्युसेकने तापीत विसर्ग सुरू, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
विजय पाटील :जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. परिणामी, आज (रविवार) सकाळी १० वाजेच्या अहवालानुसार धरणाचे २२ वक्राकार दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून, तापी नदीपात्रात ४९ हजार ५८२ क्युसेक (१४०४ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने हायअलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही तासांत धरण परिसरात २८ मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील एकूण पाऊस ७६ मिमी झाला आहे. तर पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
धरणाची सद्यस्थिती
सध्याची पाणीपातळी: २१२.१८० मीटर (पूर्ण क्षमता : २१४.००० मीटर)
एकूण जलसाठा: २८९.०० दलघमी (७४.४८%)
जिवंत जलसाठा: १५६.०० दलघमी (६१.१८%)
पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने २२ दरवाजे १ मीटरने उघडून तापी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मुख्य कालव्यातून ३०० क्युसेक (८.५० क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, उजव्या कालव्याचे दरवाजे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत.
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही विविध ठिकाणी लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये बऱ्हाणपूर – ५२ मिमी, देडतलाई – ५८.२ मिमी, लखपुरी – ९.४ मिमी, अकोला – ६.४ मिमी, टेक्सा – २७.२ मिमी, एरंडी – ३२ मिमी, गोपालखेडा – ३ मिमी, चिखलदरा – ८२.२ मिमी आणि लोहारा – २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण पाणलोट क्षेत्रात ३८८.४ मिमी, तर हतनूर परिसरात ८८ मिमी पाऊस झाला आहे.
प्रशासनाने तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.



