मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील विविध घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना (उबाठा), संजय राऊत, तृणमूल काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांच्या भवितव्यावर रोखठोक प्रतिक्रिया दिल्या. वृत्तसंस्था एएनआयशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या राजकीय निर्णयावर टीका करताना त्यालाच शिवसेनेच्या आजच्या स्थितीचे मूळ कारण असल्याचे म्हटले.
आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी महायुतीची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शिवसेनेच्या मूळ विचारधारेच्या विरोधात होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेल्यामुळेच आज अनेक जुने शिवसैनिक आणि नेते पक्षापासून दूर जात आहेत. सुरुवातीपासून एनडीएसोबत युती कायम ठेवली असती, तर आज पक्षाला ही परिस्थिती पाहावी लागली नसती, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना (उबाठा) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, पक्षातील अस्वस्थता आणि नेतृत्वाविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे अनेक खासदार आणि नेते पर्याय शोधत आहेत. त्यामुळे भविष्यात आणखी राजकीय घडामोडी घडू शकतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना आठवले यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मोठ्या प्रमाणावर खासदार पक्ष सोडून गेल्यामुळे राऊत यांचा संताप समजू शकतो. मात्र सार्वजनिक जीवनात वावरताना शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही. ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी संयम राखणे आवश्यक आहे. शिव्या देणे किंवा आक्षेपार्ह भाषा वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षण आणि परिसीमनाच्या मुद्द्यावर बोलताना आठवले म्हणाले की, काही विरोधी पक्षांनी या महत्त्वाच्या विधेयकांना विरोध करून महिलांवर अन्याय केला. आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडे आवश्यक संख्याबळ असेल आणि महिलांना न्याय देणारे निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



