चोपडा : प्रतिनिधी
अडावद येथील वरच्या माळी वाड्यातील अल्पभूधारक शेतकरी गोविंदा चैत्राम गंभीर (वय ६५) हे गतवर्षी आलेले अल्प उत्पन्न, यंदाच्या हंगामाने भरून काढू म्हणून पावसाची वाट पाहत होता. परंतु पाऊस लांबल्याने लोकांची देणी कशी फेडायची? आता आपला प्रपंच कसा चालवायचा? या विवंचनेत त्यांनी १५ रोजी पहाटे छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी गोविंदा गंभीर यांनी १५ रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या छतावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान गोविंदा गंभीर यांच्याकडे ५ एकर कोरडवाहू शेतकरी असून त्यांनी गतवर्षी मका लावला होता. त्यात त्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नव्हते. तर, यावर्षी चांगले उत्पन्न काढू, असा विचार करत कर्ज काढून त्यांनी शेत तयार केले.
मात्र, पाऊस लांबल्याने पुढील हंगामाचे उत्पन्न कसे येईल? आपले देणे कसे फिटेल ? प्रपंच कसा चालवायचा? या विवंचनेत त्यांनी १५ रोजी पहाटे आपल्या घराच्या गच्चीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, मयत शेतकऱ्याचे १५ रोजी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सकाळी १० वाजता शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी १२ वाजता अडावद येथे नातेवाईकांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत चोपडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



