जळगाव : प्रतिनिधी
महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाच्या वाहनाला संशयित कारचालकाने धडक दिल्याची घटना १३ जून रोजी रात्री शिरसोली रस्त्यावर घडली. या घटनेत दामिनी पथकातील महिला अंमलदार वैष्णवी कोरडे या जखमी झाल्या असून धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामिनी पथकातील महिला अंमलदार वैष्णवी कोरडे आणि सुशीला सूर्यवंशी या त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १९ ईडी २१८९) शिरसोली परिसरात नियमित गस्त घालत होत्या. रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास त्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल परिसरात पेट्रोलिंग करीत असताना शाळेच्या मागील बाजूस एक कार (क्र. एमएच १९ डीव्ही ७४८४) संशयास्पदरीत्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संशयास्पद वाहनाची पाहणी करण्यासाठी महिला पोलिस कर्मचारी कारच्या दिशेने जात असताना चालकाच्या लक्षात पोलिस आल्याचे आले. त्यानंतर चालकाने घाईघाईने कार मागे घेतली. यावेळी कारची जोरदार धडक दामिनी पथकाच्या दुचाकीला बसली. या अपघातात महिला अंमलदार वैष्णवी कोरडे यांच्या पायाला दुखापत झाली, तर दुचाकीचेही नुकसान झाले.
धडक दिल्यानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे सांगण्यात आले. जखमी अंमलदारांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, कारचा क्रमांक मिळाल्याने चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.



