भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील तपत कठोरा येथे बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात डंपरखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली चार वर्षीय नात सुदैवाने बचावली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावल्याने परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
तपत कठोरा येथील रहिवासी अनिल मुकुंद पाटील (वय ५७) हे आपल्या चार वर्षीय नात दिव्या हिच्यासह दुचाकी (एम.एच.१९ बी.एफ. ९३२०) वरून पिंप्रीसेकम शिवारातील शेतातून घरी परतत होते. यावेळी शिवारातील अरुंद रस्त्यावर मुरूम वाहतूक करणारा डंपर (एम.एच. १९ ई.यू. ३७३७) रिव्हर्स घेत असताना दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर अनिल पाटील हे डंपरखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारी बसलेली नात दिव्या ही थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरखाली अडकलेली दुचाकी व अनिल पाटील यांना बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातामुळे संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी संबंधित डंपरला आग लावून दिली. त्यामुळे डंपर पूर्णपणे जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मनोज मुकुंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.



