जळगाव : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील काशीद बीचवर सोमवारी जळगाव जिल्ह्यातील अमीन मजीद शेख या २५ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले.
अमीन मजीद शेख (वय २५), मलिक नजीर शेख (वय २१) आणि इम्रान अन्वर खान (वय ३७, सर्व रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद-मुरुड परिसरात आले होते. मोकळ्या वेळेत ते काशीद बीचवर फिरण्यासाठी गेले असता अमीन आणि मलिक हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलिसांचे कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. अमीन याचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी मुरुड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास सुरू आहे.



