भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील सुनसगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. वाळूचे डंपर मागे घेत असताना रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या मजुराला या डंपरने चिरडल्याची घटना सुनसगावनजीकच्या पेपर मिलसमोर ४ रोजी घडली. यात या मजुराचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाभैय्या नत्थू (३८, रा. बांदा, उत्तर प्रदेश) असे या मृत मजुराचे नाव आहे. सध्या तो सुदर्शन पेपर मिल परिसरात वास्तव्यास होता. ही घटना घडल्यानंतर चालकाने जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले असून, यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २:५० वाजता घडली.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे हेकॉ. धीरज जनार्दन मंडलिक यांनी शनिवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, डंपर (क्र. एमएच १९ झेड ८३८८) वरील अज्ञात चालकाने डंपर मागे घेत असताना झोपलेल्या राजाभैय्या नत्थू यांच्या डाव्या खांद्यावर व मानेवरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले.या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन कनेक्टिव्हिटी बंद असल्यामुळे गुन्हा नोंदविण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



