पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील लोहारा येथील लघुपाटबंधारे म्हसास धरणाजवळ दुचाकी अपघातात अल्पवयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय रमेश भिल्ल (वय १७) व भुऱ्या ऊर्फ मयूर साहेबराव भिल्ल (वय १९, दोघे रा. लोहारा) हे दुचाकी (क्र. एमएच ०३ एव्हाय ३५५५) वरून जात असताना म्हसास धरणाजवळ त्यांचा अपघात झाला. या अपघातात विजय भिल्ल याचा जागीच मृत्यू झाला, तर मयूर भिल्ल गंभीर जखमी झाला आहे.
विजय भिल्ल याची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्याचे आई-वडील लहानपणीच निधन झाल्याने तो आईच्या माहेरी वाढला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका पहूर येथून तब्बल तीन तासांनी घटनास्थळी पोहोचली. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर विजयचा जीव वाचू शकला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुमारे ३५ ते ४० ग्रामस्थांनी दुपारी सुमारे १.५४ वाजता लोहारा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोर्चा वळवला. हातात फावडे, टिकाव, दगड व विटा घेऊन आलेल्या जमावाने आरोग्य केंद्रातील औषधसाठा, खुर्च्या, पलंग, संगणक यांची तोडफोड केली. तसेच दरवाजे, टेबलावरील काचा आणि खिडक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या अचानक झालेल्या तोडफोडीमुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी घाबरून गेले असून त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, परिसरात वाढती चिंतेची बाब म्हणजे अल्पवयीन मुलांच्या हाती सर्रास दुचाकी व चारचाकी वाहनांचे स्टेअरिंग दिले जात असल्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे भविष्यात अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



