मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात ५ किंवा ७ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजेच १५ मेपूर्वी दहावीचा निकालही घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात राज्य मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षा पार पडल्या. यामध्ये बारावीच्या परीक्षेला ३७ हजार ३३८, तर दहावीच्या परीक्षेला ३२ हजार ४३३ विद्यार्थी बसले होते. परीक्षा संपल्यानंतर निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. सुरुवातीला बारावीचा निकाल एप्रिलअखेर जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती; मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निकाल प्रक्रियेला विलंब झाला.
मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बारावीचा निकाल आता ५ किंवा ७ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४ ते ५ दिवसांत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता असून १५ मेपूर्वी तो जाहीर केला जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यात १७ मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने दहावीचा निकाल त्यापूर्वी जाहीर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी यंदा परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच घेण्यात आल्या होत्या. मात्र, निकाल प्रक्रियेत झालेल्या विलंबाचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निकाल लांबण्यामागील कारणे
परीक्षा १८ मार्च रोजी संपल्यानंतर साधारणपणे २ एप्रिलपर्यंत बारावीच्या आणि १० एप्रिलपर्यंत दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाली असली तरी त्यानंतरची अहवाल तयार करणे व पडताळणी प्रक्रिया बाकी राहिली. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे ही प्रक्रिया रखडली. त्यामुळे निकाल जाहीर करण्यात उशीर झाला, अशी माहिती विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता मात्र निकाल अंतिम टप्प्यात असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत आहेत.



