जळगाव : प्रतिनिधी
शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी (दि. २५ एप्रिल) दिवसभरात शहरातील विविध भागांत कुत्र्यांनी तब्बल २१ जणांवर हल्ले करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमधील उस्मानिया पार्क, पिंप्राळा, एमआयडीसीतील सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी तसेच अक्सानगर-निमखेडी शिवार परिसरात कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. वृद्धांसह लहान मुलांवरही हल्ले झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच अँटी रेबीज इंजेक्शन विभागात रुग्णांची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक भागात रस्त्यावर मांसविक्री केली जात असल्याने ते खाऊन कुत्रे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांवर हल्ला करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
अंकुश जाधव (५२), संतोष बारेला (४०), सुनंदाबाई दुबे (२०), सुनील महाजन (२३), सरोजी कादर शहा फिरोज (७७), लतिका कोल्हे (१७), शारदा वारुडकर (८२), अनिल भट (३७), इस्माईल शेख (२७), सूर्या बागुल (३५), अकीलाबेन शेख (४०), अझर शेख शरीफ (३६), संदीप सोनार (३०), अकील खान कादर खान (३०), अहिल्याबाई ठाकूर (६०), रहीम रशीद शेख (६७), लोकेश पाटील (२९), विनोद थापा (२४), अनिता पाटील (२५), ओम अहिरे (२०) हे नागरिक जखमी झाले आहे.



