मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून, हे जाळे केवळ मुंबई आणि पुणेपुरते मर्यादित न राहता आता विदर्भातील ग्रामीण भागापर्यंत पसरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्याची परिस्थिती 10 वर्षांपूर्वीच्या पंजाबसारखी होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, अकोला, अमरावती ते नागपूरच्या ग्रामीण भागापर्यंत ड्रग्जचे जाळे पसरले आहे. याशिवाय नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथेही अंमली पदार्थांच्या घटना वाढताना दिसत आहेत. यामुळे राज्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणावर या विळख्यात अडकत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ताज्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी गृहविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणामुळे ड्रग्जचे जाळे किती खोलवर गेले आहे, हे पुन्हा एकदा समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.
वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये तब्बल 4,249 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 2025 पासून आतापर्यंत 15,933 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 2026 मध्ये काही महिन्यांतच 1,438 गुन्हे नोंदवले गेले असून 1,637 आरोपींना अटक झाली आहे आणि सुमारे 940 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अंमली पदार्थ तस्करीत मदत केल्याप्रकरणी 17 पोलिसांना बडतर्फ करण्यात आल्याचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी म्हटले की, “जेव्हा कायदा राखणारेच तस्करांना साथ देतात, तेव्हा नेस्को सेंटरसारखी प्रकरणे वाढणारच.” या पार्श्वभूमीवर त्यांनी ड्रग्ज माफियामागील राजकीय शक्तींचा शोध घेण्याचे आव्हान सरकारसमोर ठेवले.
राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्जचा प्रसार पाहता, महाराष्ट्र तातडीने ‘ड्रगमुक्त’ करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले. अन्यथा राज्यातील तरुणाई उद्ध्वस्त होईल आणि भविष्यात मोठी सामाजिक व आर्थिक किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, नेस्को सेंटरमधील पार्टीत एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘ऑरी’च्या उपस्थितीची चर्चा रंगली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणाला आणखी प्रसिद्धी मिळाली आहे.



