जळगाव : प्रतिनिधी
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करीत असलेला मजूराचा तोल जावून कोसळला. यामध्ये मुकेश गोकुळ सोनार (वय ३२, रा. तानाजी मालुसरे नगर, असोदा रोड) या बांधकाम मजूराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. १३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात घडली. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप मयताचा भाऊ राकेश सोनार याने केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मास्टर कॉलनीतील शेरा चौकात साबीर शेख यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवार दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास ठेकेदार सुरेश मिस्तरी यांच्याकडे मजूर म्हणून मुकेश सोनार हे कामाला आहे. दरम्यान, आज विशाल चव्हाण आणि सुनील सपकाळे या इतर दोन मजूरांसोबत पाचव्या मजल्यावरील रेटर माळाचे काम करत होते. त्या ठिकाणी सिमेंट भरत असताना अचानक बांधकाम धसले आणि मुकेश यांचा तोल गेल्याने ते थेट पाचव्या मजल्यावरून खाली कोसळले. यामध्ये मुकेश यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी पाहणी केली यावेळी त्यांना इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी सुरक्षा जाळी किंवा इतर कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप मयताचा भाऊ राकेश सोनार याने केला. तसेच सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे एका निष्पाप मजुराचा बळी गेल्याचेही त्यांनी सांगितले.
मयत मुकेश सोनार हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, अडीच वर्षाची मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्याने सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



