भुसावळ : प्रतिनिधी
शहराजवळील नाहाटा चौफुलीपुढे महामार्गावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेत कंटेनर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. वांजोळा रोडवरून सिंधी कॉलनीकडे महामार्ग ओलांडत असताना दुचाकीवरून जाणारे तिघे अचानक समोरून येणाऱ्या कंटेनरसमोर आले. अवघ्या काही क्षणांत निर्णय घेत चालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून कंटेनर समांतर रस्त्यावरील दुभाजकावर चढवला आणि तिघांचे प्राण वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडहून जळगावकडे जाणारा कंटेनर नाहाटा चौफुलीच्या उड्डाणपुलावरून उतरत असताना हा प्रसंग घडला. दुचाकी अचानक समोर आल्याने धडकेत भीषण अपघात होण्याची शक्यता होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर वळवला. काही सेकंद उशीर झाला असता तर अनेकांचा जीव गेला असता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
या धडकेत कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नाहाटा चौफुली ही अत्यंत धोकादायक म्हणून ओळखली जाते. याठिकाणी अनेक अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. वारंवार दुर्घटना होऊनही महामार्ग प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने संताप व्यक्त होत आहे. घटनेनंतर माजी आमदार संतोष चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि नगरसेवकांनी घटनास्थळी भेट दिली.



