बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील नाडगाव येथे ग्राम दक्षता पथकाच्या तरुणांनी राखवालदार राधेश्याम किशोर पावरा (वय २०) यांच्या हिंमतीने चार संशयितांना पकडले, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नकली नोटा सापडल्या. यावेळी काही वेळातच गावकरी धावून आल्याने मारहाणीत दोन आरोपी हे जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात सर्वाधिक चोऱ्या नाडगावमध्ये झाल्या आहेत. चोरीवर आळा बसविण्यासाठी बोदवड पोलिसांनी ग्राम दक्षता समिती स्थापन केली. समितीचे सदस्य रात्री गावात गस्त घालत असताना गुरवारी पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान नाडगाव येथील कोल्हाडी रस्त्यावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात काही संशयित दरोडेखोर दडून बसले होते. असा संशय रखवालदाराला आला.
रखवालदाराने शेतात पाहणी केली असता संशयितांनी विहिरीतील मोटार केबल चोरत असल्याचे आढळले. त्यांनी धाव घेत संशयितांसोबत झटापट केली. या दरम्यान, संशयिताने चाकू मारण्याचा प्रयत्न केला, परंतु रखवालदाराने धैर्य दाखवत झटापट सुरू ठेवली. वडिलांच्या मदतीने शेतमालकांना माहिती देण्यात आली, तसेच ग्राम दक्षता पथकाचे तरुण घटनास्थळी पोहोचले आणि झटापट सुरु राहिली. झटापटीत एमपी पासिंगच्या चारचाकी वाहनाने काही संशयित फरार झाले. उरलेले चार संशयित नागरिकांच्या मदतीने पकडले गेले आणि बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यात दोन संशयितांना डोक्याला दुखापत झाली असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जळगाव येथे हलविण्यात आले. उरलेले दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. नकली नोटांच्या बंडलांनी भरलेली पिशवी बोदवड पोलिसांच्या ताब्यात असून, त्यात ५००, २००, १०० रुपयांच्या नोटांचे बंडल आहेत


