अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरात राज्यातील अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर (एआय-171) विमान अपघातातील मृतांची संख्या 274 वर पोहोचली आहे. लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळलेल्या या विमानात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, तर उर्वरित 33 मृत्यू स्थानिक रहिवाशांचे आहेत. मृतांमध्ये बीजे मेडिकल कॉलेज कॅम्पस परिसरातील 10 डॉक्टर, त्यांचे नातेवाईक, वैद्यकीय विद्यार्थी, कर्मचारी आणि मेघनीनगरमधील रहिवासी आहेत.
शुक्रवारी (13 जून 2025) रात्रीपर्यंत चाललेल्या बचाव मोहिमेत 100 हून अधिक कामगार आणि 40 अभियंत्यांनी विमानाचा ढिगारा हटवला. यावेळी ब्लॅक बॉक्स बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी मेसच्या छतावर सापडला, ज्यामुळे अपघाताच्या कारणांचा तपास सुलभ होईल. तपास अधिकाऱ्यांनी 319 मृतदेहांचे अवयव डीएनए चाचणीसाठी पाठवले असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
मृतांमध्ये तीन डॉक्टर, एक गर्भवती महिला (न्यूरोसर्जन डॉक्टरची पत्नी) आणि एमबीबीएस विद्यार्थी जय प्रकाश चौधरी यांचा समावेश आहे. जय प्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, ज्याची ओळख कुटुंबीयांनी शुक्रवारी केली.
रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेत कॅम्पस आणि जवळील परिसरात 29 नवीन मृतदेह सापडले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा 274 वर पोहोचला आहे. बचाव कार्य आणि तपास अद्याप सुरू असून, अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण महत्त्वाचे ठरणार आहे.
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये १२ जून हा समूहाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 या विमानाच्या भयानक अपघातानंतर ही प्रतिक्रिया आली आहे, ज्यामध्ये २७४ लोकांचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०२२ मध्ये टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केले.