पुणे: वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी याला नकार दिल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे.
एक रुपयात पीकविमा दिला जात होता. मात्र, अनेक शेतकर्यांनी या योजनेत चुना लावल्याने ही योजना अडचणीत आली आहे. आम्ही ते सगळं काढलं आहे. आता तुमच्या भल्याचं करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता याबाबत नव्याने विचार केला जात असून, मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री यांची एकत्रित बैठक झाली आहे. तीत शेतकर्यांना चांगला कार्यक्रम देणार आहोत, अशी माहिती पवारांनी या वेळी दिली.
जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाच्या वतीने ‘दिशा कृषी उन्नतीची’ या जिल्ह्यातील शेतीच्या पाच वर्षांच्या आराखड्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, ‘जिल्ह्याचा पाच वर्षांचा आराखडा आखण्यात येत आहे. यासाठी निधीची उपलब्धतादेखील करून दिली जाईल. मात्र, हा निधी त्याच कामासाठी वापरावा ही किमान अपेक्षा आहे.
मी माझं जीवन संपवतोय, मुलाबाळांना सोडून आत्महत्या करतोय, ही भावना शेतकऱ्यांच्या मनात येता कामा नये, यापद्धतीने पुढे जायचं आहे. त्याचे देखील नियोजन आम्ही केले आहे आणि कामाला लागलो आहे. मी आज अर्थमंत्री म्हणून सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, त्याच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, असंही आवाहन अजित पवारांनी केलं.