जळगाव प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत रॅगिंग प्रतिबंधक समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. के. जी. कोल्हे सिनेट सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी वाघुळदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियंका ब-हाटे, डॉ. राजकुमार लोखंडे हे उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकातून प्रा. प्रियंका ब-हाटे यांनी रॅगिंग प्रतिबंधक समुपदेशन कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. रॅगिंग झाली तर विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्या संदर्भात तक्रार करणे याविषयीचे काय ते समजावून घेणे, विद्यार्थ्यांचे मानसिक दृष्ट्या समुपदेशन महत्त्वाचे आहे असे स्पष्ट केले.
आपल्या उद्घाटकीय मनोगतातून डॉ. के. जी. कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना “रॅगिंग हा प्रकार पूर्व काळापासून चालू आहे. एखाद्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन त्याची मानसिकता ढासळणे म्हणजे रॅगिंग. यामुळे काही विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त होतात. अशा विद्यार्थ्यांना रॅगिंग मधून बाहेर काढलं पाहिजे. रॅगिंग समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करणे ही आजच्या समाजाची प्रमुख गरज बनलेली आहे. छळवादाच्या मुद्याने त्रास देऊन त्यांचा विकृत आनंद घेणे ही प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे आणि त्यामुळेच काही विद्यार्थी रॅगिंगला बळी पडतात विद्यार्थ्यांनी या विषयी महाविद्यालयीन प्रशासनाकडे तक्रार केली पाहिजे” असे प्रतिपादन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी महाविद्यालयीन स्तरावर रॅगिंग प्रतिबंधक कमिटी स्थापन करण्यात येते. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीं रॅगिंगला बळी पडत असतील तर त्यांनी या कमिटीकडे आपली तक्रार नोंदवावी. मुलांप्रमाणे मुली देखील ट्रेकिंग करत असतात व रॅगिंगला बळी पडत असतात. मानसिकता बदलणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. याकडे सजन दृष्टीने बघा असे मार्गदर्शन केले.
प्रथम सत्रात रॅगिंग प्रतिबंधासाठी “महाविद्यालय व विद्यार्थ्यांची भूमिका ” या विषयावर डॉ. श्याम सोनवणे. लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय यांनी व्याख्यान दिले. रॅगिंग संदर्भात महाविद्यालय व विद्यार्थ्यांची काय भूमिका आहे. रॅगिंग म्हणजे काय याविषयी सविस्तर मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू केलं जातं आणि त्यातून काही विद्यार्थी आनंद मिळवतात त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार न करता विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो. रॅगिंगला बळी पडलेले विद्यार्थी त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात. काही वेळेस असे विद्यार्थी आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होतात. एखाद्या विद्यार्थ्याला हिनवणे, त्याला सतत अपमानित करणे हा प्रकार देखील रॅगिंग मध्ये येतो. त्यामुळे काही विद्यार्थी महाविद्यालय सुद्धा सोडतात. रॅगिंग कमिटीकडे विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर त्यास संदर्भामध्ये महाविद्यालयाने अॅक्शन घेतली जाते. व त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भावी जीवनावर होतो.” असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
द्वितीय व्याख्यान अॅड. सीमा जाधव यांचे ” रॅगिंग प्रतिबंधक कायदे” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रॅगिंगला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. रॅगिंग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही कायदे केलेले आहेत. त्यांची ओळख यावेळी विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
१९९९ साली रॅगिंग संदर्भात चा पहिला कायदा अमलात आणला गेला. रॅगिंग करणाऱ्याला प्रतिबंध करणे या संदर्भात न्यायालयाने निर्देश दिले. एखाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जो त्रास दिला जातो त्याला रॅगिंग म्हटले जाते हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे कोर्टाने या संदर्भात कायदे केले आहे. महाविद्यालयीन स्तरावर तुम्ही दिलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर यूजीसी कडे या संदर्भात तुम्ही तक्रार करू शकतात. एखादा विद्यार्थी रॅगिंगला बळी पडला तर त्याने महाविद्यालयीन स्तरावर तक्रार करावी. या तक्रारी संदर्भात सात दिवसात दखल घ्यावी लागते. रॅगिंग संदर्भात गुन्हा करणार्या विद्यार्थ्यांना पाच वर्षापर्यंत कुठल्याही संस्थेत प्रवेश मिळत नाही. या विषयाचे गांभीर्य विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन रॅगिंग करू नये व कोणावर करू नये असे प्रतिपादन केले.
दुपारच्या सत्रात तृतीय व्याख्यान मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कीर्ती देशमुख यांचे “रॅगिंग प्रतिबंधक समुपदेशन” या विषयावर झाले. रॅगिंगला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे असते. काही विद्यार्थी रॅगिंग हा गुन्हा आहे. याविषयी अनभिज्ञ असतात. काही अपमानाचा बदला घेण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करतात. विद्यार्थ्यांचे यामुळे करियर नष्ट होते. या घातक प्रवृत्तीला खतपाणी न घालता विद्यार्थ्यांचे समुपदेशन महाविद्यालय स्तरावर करून त्यांना सक्षम बनवणे, रॅगिंग समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करणे, रॅगिंगच्या संदर्भात फलक लावणे या सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग संदर्भात जनजागृती करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
रॅगिंग समुपदेशन कार्यशाळेला महाविद्यालयातील ११० विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. देवयानी पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. कुमुदिनी पाटील, प्रा. राजश्री पाचपांडे, प्रा. वर्षा आठे , प्रा. तृप्ती काळे प्रा. डॉ. राजकुमार लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.