भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कजगाव-वाडे मार्गावरील मनमाड कंपनी भागातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात दि. २२ रोजी मध्यरात्री चोरट्याने चोरी करत मंदिरातील तांबे-पितळीच्या ८० हजार रुपये किमतीच्या वस्तू लांबवल्या आहेत. हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कजगाव-वाडे मार्गावरील संजय चिला पाटील यांच्या शेतातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात दि. २२ रोजी रात्री चोरट्याने तांबे, पितळ यांच्या विविध वस्तू लांबवल्या आहेत. याचं मंदिरात या अगोदरदेखील तीन ते चार वेळेस चोऱ्या झाल्या आहेत. मात्र, एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
काही दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री पर्वाच्या तीन दिवस अगोदर महादेव मंदिरात चोरी केल्याने शिवभक्तांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे मंदिरात इतक्या वेळा चोरी झाली असताना दुसरीकडे शेतकऱ्यांची अवजारे व कृषी पंपाच्या साहित्याचीही चोरी होत आहे. या चोऱ्यांचा तपासच लागत नसल्याने चोरटे निर्धावले असून चोऱ्यांचे प्रमाण आणखीनच वाढले आहे. त्यामुळे या चोऱ्यांचा तपास करून चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.