चोपडा : प्रतिनिधी
राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना नुकतेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत उमर्टी गावात जाऊन आपल्या कर्मचाऱ्याची सुखरुप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर दोन उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. चोपडा ग्रामीण पोलीस हे महाराष्ट्रात असलेल्या ऊमर्टी गावात गेले आणि तिथं पोलिसांनी आरोपीला अटक केली मात्र त्याचवेळी आरोपीला अटक केल्याने काही जण पोलिसांवर धावून गेले. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याला मध्य प्रदेशातील ऊमर्टी गावात घेऊन गेले. आरोपीला सोडा तोपर्यंत पोलिसाला सोडणार नाही, अशी भूमिका अपहरण करणाऱ्यांनी घेतली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी उमर्टी गावाकडे तातडीने रवाना झाले. घटने संदर्भात मध्य प्रदेश पोलीस आणि प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. अखेरीस उमर्टी गावातून अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांनी सुखरूपपणे ताब्यात घेतलं आहे. आरोपींच्या तावडीतून पोलीस कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली आहे,
सीमे पलीकडे मध्यप्रदेशात असलेल्या उमर्टी गावात जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी अपहरण झालेल्या कर्मचाऱ्याला घेण्यासाठी मध्य प्रदेशातील ऊमर्टी गावात पोहोचले होते. या कर्मचाऱ्याला घेऊन महाराष्ट्र पोलीस अपहरण चोपड्यात रात्री उशिरा दाखल झाले आहे. पण घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पण महाराष्ट्र पोलिसांनी खमक्या दाखवत सीमेपलीकडे जाऊन आपल्या कर्मचाऱ्याला सुखरूपपणे परत आणलं.