नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाकुंभ सुरु असल्याने कोट्यावधी भाविक सहभागी होत असतांना आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बोलेरो आणि बसमध्ये धडक झाली. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत.
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील भाविक कुंभमेळ्यात संगमामध्ये स्नान करून बोलेरोने परतत होते. त्याचवेळी मध्य प्रदेशातील राजगड येथील भाविकांची बस आणि बोलेरोमध्ये धडक झाली. धडक एवढी भीषण होती की बोलेरो चक्काचूर झाली. अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले. घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.