
जळगाव : प्रतिनिधी
रात्रीच्या सुमारास तीन वर्षीय बालकाला उचलून त्याला घेवून जात असल्याच्या संशयावरुन ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने पब्लिक मार दिला. या बेदम मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २३ रोजी रात्रीच्या सुमारास आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ घडली. या प्रकरणी जमावाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा, खु, ता. जळगाव) हे वास्तव्यास आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ३० ते ३५ वर्षीय अनोळखी मनोहर सोनवणे यांच्या तीन वर्षीय बालकास उचलून घेऊन जात असल्याचा त्यांना संशय आला. त्या कारणावरुन मनोहर सोनवणे यांच्यासह १५ ते २० जणांच्या जमावाने त्या संशयित तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच या मारहाणीत एकाने काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये अनोळखी तरुणाच्या डोक्यावर, हाता, पायावर व डोळ्याजवळ जबर दुखापत झाल्यामुळे तो रस्त्यावर पडलेला होता.
बेदम मारहाणीत तरुण जिनिंगजवळ रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ रामकृष्ण इंगळे, गुलाब माळी, धनराज पाटील, विजय निकम, कैलास इंगळे, श्रीकांत बदर हे घटनासथळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या अनोळखी तरुणाला तात्काळशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्या अनोळखी तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला.
पब्लिक मारमुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळताच पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पोहेकॉ रामकृष्ण इंगळे, श्रीकांत बदर, गुलाब माळी, धनराज पाटील, पोलिस नाईक विजय निकम, कैलास इंगळे, प्रदीप राजपूत हे संशयितांच्या शोधार्थ रवाना झाले. त्यांनी संशयित मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खुर्द, ता. जळगाव), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, ता. यावल, ह.मु. लिंबायत, सुरत), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोद, ता. यावल), अफताब आरीफ खाटीक (रा. कुंभारवाडा, शनिपेठ, जळगाव) यांना ताब्यात घेतले



