पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील देशमुख वाडी भागातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. त्यात घरातील संसारोपयोगी वस्तूंसह अडीच लाखांची रोकड जळून खाक झाली. यात सहा महिन्यांची चिमुरडी गंभीररीत्या भाजली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात उशिरा घटनेची नोंद करण्यात आली. देशमुखवाडी भागातील रहिवासी सादिक लतीब मण्यार यांच्या राहत्या घरात दपारी एकच्या समारास घटना घडली.
विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर निघाला. घरामध्ये सहा महिन्यांची चिमुकली झोळीत झोपलेली होती. तातडीने सादिक मण्यार घरी आले. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरातील साहित्य, जागा घेण्यासाठी नातेवाइकांकडून आणलेले २ लाख ६० हजार रोख जाळून खाक झाले. झोक्यातील चिमुरडीला आस लागल्याने ती गंभीर जखमी झाली. पोलिसात घटनेची नोंद झाली आहे