लातूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता नुकतेच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे काका बाबा पाटील यांच्या कारला अपघात झाला आहे. बाबा पाटील यांची इनोव्हा कार पिकपला धडकल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कारच्या एअर बॅग उघडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. लातूर – उमरगा मार्गावरील नारंगवाडी तलावाजवळ हा अपघात घडला.
सविस्तर वृत्त असे कि, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्ली येथे आहेत. मात्र, या दरम्यान त्यांचे काका बाबा पाटील यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे काका बाबा पाटील प्रवास करत होते. याच दरम्यान लातूर – उमरगा मार्गावरील नारंगवाडी तलावाजवळ त्यांच्या कारने एका पिकपला धडक दिली. या अपघातात इनोव्हा कारच्या एअर बॅग उघडल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या अपघातात पाच जण हे जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नावाचा देखील यात समावेश केला जात होता. मात्र दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गटाच्या नऊपैकी आठ खासदारांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच कायम असणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केल्याच्या बंडाच्या वेळी देखील ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यावेळी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम असल्याचे सांगितले होते.