चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील नागद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोरील झोपडपट्टी भागात अचानक तीन घरांना आग लागली. या आगीत गरीब नवाज या मंडप व्यावसायिकाचे सर्व मंडप साहित्य तसेच बाजूच्या चार घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे या कुटुंबांचा संसार रस्त्यावर आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. या भागात आठवड्याभरात आगीची दुसरी घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील तंबाखूच्या कारखान्याजवळ असलेल्या वस्तीमधील शेख अब्दुल शेख अमीर, जग्गू मंडपवाले, आमीर खान मुनीर खान, कादर अली सय्यद अली यांच्या घरांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत गरीब नवाज या मंडप व्यावसायिकाचे मंडप साहित्य जळून खाक झाले. घरांमधील संसारोपयोगी साहित्य, भांडे, किराणा, कपडे यासह इतर सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
गेल्या महिन्यापासून या घरांमध्ये कमी जास्त होणाऱ्या वीज प्रवाहामुळे वीज मीटर लगत स्पार्किंग होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी या नागरिकांनी महावितरण कंपनीकडे केल्या होत्या. मात्र, त्याकडे लक्ष न दिल्याने ही घटना घडली, असा गंभीर आरोप या नागरिकांनी करून त्याबाबत संतापही व्यक्त केला.
याप्रसंगी अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे, फायर वाहन चालक ईश्वर पाटील, रमेश राठोड, बापू ठाकूर, फायरमन चंद्रकांत राजपूत, संदेश पाटील, राहुल राठोड, नितीन खैरे, विशाल मोरे, सागर देशमुख, शशिकांत चौधरी, फायर कंट्रोल रूम कर्मचारी रितेश देशमुख, कपिल पगारे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.