जळगाव : प्रतिनिधी
जळगाव पोलीस गेल्या दोन दिवसापासून अनेक गुन्हाची उकल करत असतांना दिसून आले आहे. जळगाव शहर आणि इतर परिसरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीसह इतर भागात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना देण्यात आले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दुचाकी चोरी करणारा सराईत गुन्हेगार विक्की नंदलाल भालेराव (वय २८, रा. वाघनगर, जळगाव) हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याचे समजले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचारी प्रदीप चौधरी, विकास सातदिवे, रतन गिते, राहुल घेटे, योगेश बारी आणि योगेश घुगे यांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी विक्की भालेराव याला अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, विकास सातदिवे आणि रतन गिते हे अधिक तपास करत आहेत.