पारोळा : प्रतिनिधी
भरधाव वेगाने जाणारे टँकर पारोळा शहराच्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपास जवळ उलटले असून यातून गॅसची गळती होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पारोळा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासच्या जवळ रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास अपघात घडला. यात धुळ्याकडून जळगावकडे जाणाऱ्या टँकरच्या चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते टँकर हायवेच्या बाजूला जाऊन उलटले. तसेच यातून तात्काळ गॅसची गळती सुरू झाली.
या अपघाताची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातानंतर या टँकरमधून गॅसची गळती झाल्यामुळे परिसरात घबराट पसरली. पुढे कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांना सतर्कत्ोचा इशारा दिला असून अनेक जण आपापल्या घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोलीस ठाण मांडून बसले असून सोबतीला अग्नीशामक दलाचा बंब आणि रूग्णवाहिका देखील बोलावण्यात आलेली आहे. पोलिसांमुळे हायवेवरील वाहतूक सुरळीत झाली आहे. तर या अपघातात नेमके किती जण जखमी झाले याची माहिती मात्र अद्याप समोर आली नाही.