भुसावळ : प्रतिनिधी
शहरात गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक पोलिस वाहन तपासणी करीत आहेत. दोन दिवसांत शहरात १९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. सुमारे एक लाख १९ हजाराची दंड आकारण्यात आला आहे. यामुळे पालकांनो, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नका अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश महाले यांच्या पथकाने ही धडक कारवाई सुरू केली आहे. मुलांच्या हट्टापायी पालक मुलांना दुचाकी देतात मात्र, शाळकरी विद्यार्थी नियमांना बगल देतात. यासाठी पोलिस प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहेत. परिवहन विभागानुसार, १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना मिळतो. तथापि, काही पालक अल्पवयीन विद्यार्थ्यांना वेळेची बचत करण्यासाठी आणि क्लासेस किंवा कॉलेजला जाण्यासाठी वाहने चालवण्याची परवानगी देतात, ज्यामुळे अनेक अपघात घडतात. तसेच विद्यार्थी बेशिस्तपणे वाहने चालवितात. यावर आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात येत आहे. शहर वाहतूक शाखेच्या पथकाने रविवारी एकूण १२६ वाहनांवर कारवाई करीत ८० हजार १०० रुपयाचा दंड ठोठावला तर सोमवारी ६७ वाहनांवर ३९ हजार ३०० रुपयाचा दंडात्मक कारवाई केली.