जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात थंडीचा जोर वाढतच असून, रविवारच्या तुलनेत सोमवारी पुन्हा रात्रीच्या तापमानात काही अंशी घट झाली. सोमवारी रात्री पारा ७.८ अंशापर्यंत घसरला होता. दिवसाच्या तापमानातदेखील लक्षणीय घट झाल्यामुळे दुपारच्या वेळेस गारठा जाणवत आहे. दरम्यान, १७ व १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
कडाक्याच्या थंडीपासून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम संपूर्ण जनजीवनावर झालेला दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो थंडीच्या काळात घराबाहेर निघणे टाळावे. थंडीपासून बचाव करतील अशीच कपडे परिधान करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.