भुसावळ : प्रतिनिधी
शहरात लग्नातील मेहंदीच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी बंद घरातून भर दिवसा २५ तोळे सोन्यासह रोकड, असा सुमारे २३ लाखांचा ऐवज लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चोरीची ही घटना शिवशक्ती कॉलनी जवळील सोमनाथ नगरात सोमवारी दुपारी तीन ते रात्री दहा वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ नगरात सुमारे दहा वर्षांपासून इलेक्ट्रिशियन अनिल हरी बन्हाटे हे राहतात. त्यांची पत्नी सेवानिवृत्त शिक्षिका आहे. बन्हाटे यांच्या पुतण्याच्या लग्नाचा मेहंदीचा कार्यक्रम शहरातील वांजोळा रोड, परिसरात असल्याने हे दाम्पत्य सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडले.
बऱ्हाटे दाम्पत्याने काही वर्षांपूर्वी सोन्याची पोत व साखळी, डोरले असे एकूण २५ तोळ्यांचे दागिने स्नानगृहातील कप्प्यावरील अडगळीत ठेवलेल्या खलबत्त्यात लपवून ठेवले होते. प्राथमिक अंदाजानुसार माहितगार चोरट्यांनी बहऱ्हाटे दाम्पत्याच्या घराची मागची जाळी तोडून प्रवेश करीत आधी स्नानगृहात लपवलेले सोन्याचे दागिने चोरले, तसेच कपाटासह किचन ओट्यातील डब्यांमध्ये लपवलेले एकूण ३ लाख ८० हजारांची रोकडही लांबवली. दाम्पत्याने लपवलेल्या रोकडसह दागिन्यांची चोरट्यांना माहिती असावी व त्यातूनच त्यांनी हा मुद्देमाल चोरल्याचा यंत्रणेला संशय आहे.