जळगाव : प्रतिनिधी
नंदुरबारहून जळगावला येत असलेल्या दोन मित्रांना जळगाव रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वाजता घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम विजय वाघेला (वय २३, अहमदाबाद) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. समर्थ रघुवंशी (वय २२,रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी झाला आहे. स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन भावसार व रवींद्र पाटील यांनी अपघातातील दोघांना जीएमसीत दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी ओम वाघेला याला मृत घोषित केले.
दोन्ही मित्र जळगावला येत असताना सुरतहून येणारी रेल्वे आऊटरला काही वेळ थांबली. रेल्वे थांबली असल्यामुळे दोन्ही मित्रांनी रेल्वेमधून उतरून रेल्वे रूळा लगतच चालत रेल्वे स्टेशन गाठण्याच्या निर्णय घेतला. काही वेळानंतर जळगावकडून जाणाऱ्या तुलसी एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत दोन्ही मित्र रेल्वे रूळ लगत फेकले गेले. त्यात ओम वाघेला याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. ओम व समर्थ हे दोन्ही मित्र बडोदा येथे एकाच महाविद्यालयात शिकायला होते. जळगावहून काही मित्रांसोबत ते नाशिकला रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जळगाव रेल्वे स्टेशनवर ओम व समर्थ यांचे काही मित्र त्यांना घ्यायला देखील आले होते. मात्र रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच हा अपघात झाल्यामुळे मित्रांची भेट ही होऊ शकली नाही.