यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील अट्रावल येथील शेतकऱ्याच्या राजोरा रस्त्यावरील शेतात अज्ञात माथेफिरूने कोयत्याने कापणी योग्य सुमारे १ हजार ८०० केळीची खोडं कापून फेकली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे तब्बल ५ लाख ९४ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षांत अट्रावल गावातील ही चौथी घटना आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी यावल पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अट्रावल, ता. यावल या गावातील शेतकरी मयूर सुरेश वारके यांनी आपल्या अट्रावल शिवारातील राजोरा रस्त्यावर असलेल्या शेतात ४ हजार ८०० केळी खोडं लागवड केली आहे. केळी कापणी योग्य झाली आहे. त्यातील २३० खोड केळी कापणी केली होती. १ हजार ८०० केळीचे खोड हे कापणी योग्य होते. येत्या दोन दिवसांत ती कापणी होणार होती. मात्र, तत्पूर्वीच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात माथेफिरूने कोयत्याच्या साह्याने केळीचे घड कापून फेकले. हा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिस ठाण्यात मयूर वारके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहेत.