भुसावळ : प्रतिनिधी
शहराजवळील नवोदय उड्डाणपुलाजवळ भुसावळहून चिखलीकडे जाणारा एक ट्रक थेट दुभाजकावर जाऊन आदळून उलटला. सुदैवाने यात चालक व क्लिनर बालंबाल बचावले आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाग्यांचे बंडल घेऊन हा ट्रक (क्र. एमएच- १८-बीजे-८४२३) राजकोट येथून वर्धा शहराकडे जात होता. भुसावळ शहरातील महामार्गाने जात असताना नाहाटा कॉलेजनजीक नवोदय उड्डाणपुलाजवळ तीव्र गोलाकार वळणावर चालक बबन मोरे (२६, रा. एरंडोल) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरच्या दुभाजकावर जाऊन आदळत उलटला. ट्रकमध्ये धाग्याचे तीनशे बॉक्स होते. यात चालकासह क्लीनर सुरेश पाटील बालंबाल बचावले आहेत.
धोकादायक दुभाजक व वळण भुसावळ शहरातून नागपूरकडे जाताना नवोदय विद्यालयाच्या उड्डाणपुलाजवळ धोकादायक गोलाकार वळण व दुभाजक आहे. नवीन वाहनचालकाला या वळणाचा व दुभाजकाचा मुळीच अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी मोठे अपघात घडतात. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये किमान तीन वाहनचालकांना येथे आपले जीव गमवावे लागले आहेत. या ठिकाणी रेडियम अथवा दिशादर्शक फलक लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघात घडल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाले यांच्यासह हेकॉ. विजय चव्हाण, विकास बाविस्कर, गजानन पाटील हे कडाक्याच्या थंडीत अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ट्रकमध्ये अडकलेला चालक व क्लिनर यांना तत्काळ बाहेर काढले आणि बाजूलाच असलेल्या ट्रामा सेंटर रुग्णालयात दाखल केले. इतकेच नव्हे तर चहा, पाणी नाश्त्याची सोय सुद्धा करून दिली व त्वरित त्यांच्या नातेवाइकांनाही यांची माहिती देत खाकीतल्या अधिकाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवले.