भुसावळ : प्रतिनिधी
शहराजवळील राजस्थान मार्बल व वांजोळा रोड फाट्याजवळ असलेल्या टेंट हाउसच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याने गोडाऊनमधील डीजे, मंडप, खुर्चा आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग विझवण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचा अग्निशमन बंब दाखल झाला, आग विझवण्याचे काम रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालले. या घटनेबाबत उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. आग लागल्याची वार्ता पसरताच, भुसावळ पालिकेचे तीन अग्निशमन बंब याशिवाय यावल पालिकेचा व ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचा अग्निशमन बंब तसेच खासगी पाण्याचे टैंकरही घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ५ वाजेच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागले
या गोडाऊनच्या बाजूला असलेल्या रहिवाशांमध्ये या भीषण आगीमुळे भीती पहावयास मिळाली. अनेकांनी आपले सिलिंडर बाहेर आणून ठेवले होते व काहींनी महत्त्वाचे सामानासह इतर ठिकाणी स्थलांतर केले होते.
महामार्गालगत रेल्वे उड्डाणपुलाजवळ आगीची घटना घडल्यामुळे महामार्गावरील जाणाऱ्यांनी आग पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती, अनेकांनी आगीचे रौद्ररूप मोबाइलमध्ये टिपले, तर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी राजेंद्र फातले, तहसीलदार निता लबडे, तलाठी पवन नवगाळे यांच्यासह पालिकेचे व महसूलचे कर्मचारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तसेच आगीवर त्वरित नियंत्रण मिळावे यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या