जळगाव : प्रतिनिधी
सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच असून, मंगळवारी (२६ नोव्हेंबर) सोने भावात एक हजार ४०० रुपयांची घसरण होऊन ते १० ग्रॅमसाठी ७६ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चांदीच्याही भावात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ८९ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी भावात मोठी घसरण झाली. दोन दिवसांत मिळून सोने व चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू २,७०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
सोमवारी, २५ रोजी सोने एक हजार ३०० रुपयांनी तर चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांची घसरण झाली होती. ऑक्टोबर महिन्यापासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर मात्र दोन आठवड्यांपासून भाव कमी-कमी होत गेले. चांदी आता ८९ हजारांवर आल्याने हे भाव गेल्या सव्वा दोन महिन्यातील सर्वात कमी भाव आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी चांदी ८८ हजार ६०० रुपये होती. त्यानंतर तिचे भाव वाढतच गेले होते.