भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वरणगाव येथून जवळच असलेल्या फुलगाव येथील तिघांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. यापैकी गणेश देवराम सोनवणे हा गंभीर अवस्थेत होता. जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. हल्ली जिकडेतिकडे मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्यांच्या चाव्यामुळे काहींना जीवही गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे २२ ऑगस्ट रोजी एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांना चावा घेतला. याच दिवशी फुलगाव उड्डाण पुलालगत कुत्र्याने झोपलेल्या एका ६० वर्षीय इसमाच्या तोंडावर चावा घेतला होता व नंतर या मोकाट कुत्र्यांनी आपला मोर्चा फुलगाव गावाकडे वळवला व त्याच कुत्र्याने गणेश देवराम सोनवणे (वय ३०) या युवकाला चावा घेतला होता. यामुळे गणेश सोनवणे याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तेथील एक दिवसाच्या उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला घरी जावून औषधोपचार घेण्याचा जाण्याचा सल्ला दिला.
मात्र, १८ दिवसानंतर गणेश सोनवणेला सोमवारी रात्री अचानक जास्त प्रमाणात त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी गणेशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व १० रोजी अखेर त्याचा मृत्यू झाला. यामुळे फुलगावसह परिसरात मोकाट श्वानांबाबत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात असलेल्या श्वानांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. मयत गणेशच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई-वडील असा परिवार असून सर्वसाधारण कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने गावात अधिकच हळहळ व्यक्त होत आहे.