चाळीसगाव : प्रतिनिधी
फक्त बोलबच्चनगिरी व शब्दांचा खेळ करण्यात पटाईत असणारे उन्मेष पाटील यांची विश्वासार्हता सर्व जिल्ह्याला माहिती आहे. दूध संघांवर आरोप करणारी पत्रकार परिषद हा त्याचाच एक नमुना असून अर्धवट माहिती दातांत खोटे आरोप व जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भेसळ व इतर मुद्द्यांवर दूध संघाची बदनामी केली म्हणून पुढील काळात विक्रीवर त्याची दुरोगामी परिणाम होणार आहेत. उन्मेष पाटील व प्रमोद पाटील यांनी राजकारण करताना दूध संघाच्या हिताचाही विचार करावा, आपल्या राजकीय वैयक्तिक स्वार्थासाठी दूध संघाच्या विश्वासार्थाबाबत खोटी माहिती पसरू नये. आजपर्यंतच्या इतिहासात दूध संघाच्या दुधात भेसळ झाल्याबाबत साधा आरोप देखील कोणीही केला नाही अगदी स्पर्धकांनी देखील नाही. यासोबतच दूध संघाचा ताळेबंद दूध संघाच्या विद्यमान संचालकाच्या उपस्थितीत वाचला जातो ही बाब गंभीर आहे.
गेल्या दोन वर्षात दूध संघात मंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, मंत्री अनिलदादा पाटील व सर्व ज्येष्ठ संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे काम करत मागील कार्यकाळातील नऊ कोटींचा तोटा भरून काढत यावर्षी नऊ कोटींचा निव्वळ नफा दूध संघाने मिळवला आहे. दुग्धविकास मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दरवाढ संदर्भात बैठक लावून देखील प्रश्न मार्गी लावला आहे,हे सर्व दूध उत्पादक व शेतकरी वर्गाला माहित आहे. मात्र येत्या ५ तारखेला वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांच्या बोनस बाबत मोठा निर्णय होणार असल्याची चाहूल उन्मेष पाटील यांना लागल्याने याचे श्रेय विद्यमान संचालक मंडळाला जाईल या भीतीने त्यांनी पत्रकार परिषद घेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र सभासद सुज्ञ आहे त्यांना यामागील सर्व राजकारण समजत असल्याने ते या बोलबच्चन गिरीला बळी पडणार नाहीत हा विश्वास असल्याची प्रतिक्रिया जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
याआधी उन्मेश पाटील यांनी असेच पत्रकार परिषदा घेत बेलगंगेच्या नावाने राजकारण करत आमदारकी मिळवली मात्र त्यानंतर तो मुद्दा त्यांनी सोडून दिला, खासदार झाल्यानंतर गिरणा बदलून बंधाऱ्याचे स्वप्न दाखवत मतदारसंघाला झुलवत ठेवले मात्र आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ना बेलगंगा सुरू केला ना गिरणा नदीवर बलून बंधारे बांधले. ठेकेदारांना ब्लॅकमेलिंग करणे, टक्केवारीसाठी तगादा लावणे यासाठी ते कुप्रसिद्ध आहेत. शेतकऱ्यांकडून विहिर मंजुरीचे पैसे जमा करून ते आपल्याला द्यावेत यासाठी उन्मेष पाटील यांनी आमदार असताना तत्कालीन चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तगादा लावला म्हणून सदर गटविकास अधिकारी यांनी विष प्राशन केले होते, माजी खासदार येथे नाना पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर असणारे चाळीसगाव धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे कामाच्या या उन्मेष पाटील यांच्या टक्केवारी च्या तगाद्यामुळे तीन वेळा निविदा काढाव्या लागल्या, अखेर ठेकेदाराने पैसे दिले तेव्हाच या महाशयांनी चाळीसगाव धुळे रस्त्याचे काम सुरू होऊ दिले तोपर्यंत शेकडो जीव या महामार्गावर गेले. आपल्या टक्केवारीसाठी शेकडो निरपराध लोकांचा जीव घेणारा उन्मेष पाटील हा भ्रष्टाचाराचा शिरोमणी नंबर वन आहे त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे मोठे हास्यास्पद आहे. याच कारणामुळे उन्मेष पाटील यांचे तिकीट नाकारले गेले. आता काहीच काम नसल्याने खोटा शेतकऱ्यांचा व दुध संघाचा कळवळा दाखवत आहे मात्र जेव्हा आम्ही दूध संघातील तूप आणि लोण्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला त्यावेळी उन्मेष पाटील का मूग गिळून गप्प बसले होते ? त्यावेळी झालेल्या दूध संघातील भ्रष्टाचाराला उन्मेश पाटील यांचे समर्थन आहे का ? एवढाच भ्रष्टाचाराचा तिटकारा होता तर त्यांनी त्यावेळी दूध संघाची निवडणूक का लढवली नाही ? हा साधा प्रश्न माझा आहे.
यासोबतच त्यांनी माजी खासदार उन्मेश पाटील व संचालक प्रमोद पाटील यांनी केलेल्या आरोपांवर आकडेवारी सह उत्तर दिले आहे, गेल्या दोन वर्षात दूध संघात झालेल्या भ्रष्टाचाराचा एक आरोप त्यांनी पुरावासह सिद्ध करून दाखवावा त्याक्षणी राजीनामा देईल. असे आव्हान देखील आमदार व दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी दिले आहे.
यासोबतच एका गंभीर बाबीकडे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी लक्ष वेधले असून जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही येत्या ५ तारखेला होणार आहे मात्र ती होण्यापूर्वीच संघाची बॅलन्स शीट ही उन्मेष पाटलांच्या हातात कशी येते व त्याची माहिती देखील उन्मेष पाटील हे संचालक प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकारांना देतात ही बाब गंभीर व बेकायदेशीर आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील हे उन्मेष पाटील यांच्या हाताचे बाहुले झाले आहेत अशा पद्धतीची त्यांची त्यावेळची देहबोली पाहताना निश्चितपणे एक दूध संघाचे चेअरमन म्हणून वाईट वाटले आणि या बेकायदेशीर कृतीला समर्थन देणे हे देखील संचालक प्रमोद पाटील यांचे अपयश म्हणावे लागेल असा आरोप देखील आमदार चव्हाण यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत जे आरोप करण्यात आले आहेत त्याला आमदार मंगेश चव्हाण व दूध संघातर्फे खालील खुलासा करत उत्तर देण्यात आले आहे.
गाय दूध अनुदान पहिल्या टप्प्याचे संपुन ६ महिने झाले आहे. तसेच दूस-या टप्प्याचे अनुदान सुरू होवून
६५ दिवस झाले आहे. अद्याप अनुदान शेतक-यांना मिळाले नाही ? हा आरोप दिशाभूल करणारा असून पहिल्या टप्प्यातील अनूदान ३१/०८/२०२४ रोजी संपुर्ण जमा झालेले आहे. यामध्ये एकूण ८,८८७ दूध
उत्पादकांना १ कोटी ८९ लाख रू. अनूदानाची रक्कम प्राप्त झालेली आहे. तर दूस-या टप्प्यामध्ये एकूण १०,९६९ पात्र दूध उत्पादकांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेली आहे. त्यांनादेखील लवकरच अनुदान मिळेल.
सन २०२२-२३ या वर्षामध्ये डिसेंबर अखेर अंदाजे ९.६० कोटीचा त्यांच्याच कार्यकाळात झालेला तोटा नवीन संचालक मंडळाला मिळाला होता. सदरील तोटा हा कमी करून ६.७२ कोटी तोटा वर्षाअखेर असल्यामुळे त्यावेळी न बोनस देणे शक्य झाले नाही. मात्र या आर्थिक वर्षात सुयोग्य नियोजनामुळे मागील तोटा कमी करून जवळपास नऊ कोटी रुपये एवढा भरघोस नफा दूध संघाला झाल्यामुळे रेकॉर्ड ब्रेक असा बोनस दूध उत्पादकांना देण्यात येणार असल्याची कुणकुण उन्मेष पाटील यांना लागल्याने त्यांनी याचे श्रेय घेण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची उठाठेव केली आहे. उन्मेष पाटील यांची आधीपासूनच ही मोडस ऑपरेंडी असून शासन – प्रशासनात किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयात एखादे धोरण ठरत असेल किंवा निर्णय होत असेल याची कुणकुण लागल्यावर त्याबाबत पत्रकार परिषद घेणे, शासनाला पत्र देणे, हे त्यांचे नेहमीचे काम आहे व नंतर मी पत्र दिले, मी मागणी केली, मी पत्रकार परिषद घेतली म्हणून हा निर्णय झाला हे धोरण ठरले अशी बनवाबनवी करणे हा त्यांचा स्वभाव आहे. आजची पत्रकार परिषद त्याचाच एक भाग आहे.
मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हयातून प्रथम येणा-या संस्थेत तज्ञ संचालकम्हणून नियुक्त करु असे सांगितले. त्याची प्रोसिडींग झाली आहे का ? असा आणखी एक बालिश प्रश्न महाज्ञानी उन्मेष पाटील यांनी विचारला आहे मात्र त्यांना सहकार कायद्यातील एक सर्वसामान्य ज्ञान असायला हवे की, मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग आगामी सर्वसाधारण सभेमध्ये कायम झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होते, आणि यावर्षीची सर्वसाधारण सभा ही येत्या ५ तारखेला असल्याने त्यानंतर याची अंमलबजावणी होईल याचा अभ्यास उन्मेष पाटील यांनी करायला हवा होता.
पशुखाद्याची गुणवत्ता ढासळली आहे म्हणून पशुखाद्य विक्री कमी झाली असा एक अर्धवट माहीती वरून चा आरोप त्यांनी केला आहे, वास्तविक बारदान एवजी प्लास्टिक पॅकिंग बॅग वापरण्याच्या निर्णयामुळे संघाची 1 रु 25 पैसे प्रतिकिलो बचत झाली मात्र सद्यस्थितीत संस्था आणि उत्पादकांचे सर्वेक्षण केले असता ४ एम. एम. च्या कांडीची मागणी असल्याने व ६५ किलो बारदानची मागणी असल्याने विक्री जरी कमी झालेली दिसत असली तरी खर्च कमी झाल्याने त्याची भरपाई निघाली आहे.
उमेश पाटील यांची पत्रकार परिषद पाहता त्यांनी जळगाव जिल्हा दूध संघाची बदनामी करण्याचा ठेकाच घेतला आहे की काय अशी शंका यावी असे आरोप त्यांनी काही केले आहेत, दूध संघात खाजगी भेसळयुक्त दूध येत आहे. त्यात युरीया व तेल टाकले जाते हा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला आहे, मात्र हा आरोप अतिशय निराधार असून दूध संघात अत्याधुनिक एफटीआर व गॅस क्रोमिटोग्राफी हे संयंत्र वापरल्याने भेसळयुक्त दूध स्वीकारले जात नाही, त्यामुळे त्यापासून बनलेले दुग्धजन्य पदार्थ बाजारपेठ मध्ये जाताना 100 टक्के शुद्ध असतात. मात्र उन्मेष पाटील यांच्या या निराधार व संघाची बदनामी करणाऱ्या आरोपांमुळे संघाच्या दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर परिणाम होणार आहे याचा साहजिकच फटका शेतकऱ्यांना बसेल.
दूधाची विक्री मागील १० वर्षाच्या तूलनेत आर्थिक वर्षात दूधाची विक्री कमी झाली आहे. ? याचे कारण
मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात पुढील आर्थिक परिणामांचा विचार न करता निवडणूकीच्या वेळी दूध खरेदीचे दर गरज नसतांना वाढविले गेले. ज्यामुळे तोटा होवू नये म्हणून १५ दिवसांच्या कालावधीमध्ये २ टप्प्यांमध्ये एकूण रू. ४/-विक्री दर वाढविल्यामुळे त्या काळातील विक्रीमध्ये १० टक्क्यांनी घट मागील संचालक मंडळाच्याच कार्यकाळात झाली होती.
नोव्हेंबर २०२३ मध्ये दूधाला दर रु. २७/- दिला व त्यापासून अतिरिक्त दूधाची लोणी व भुकटी तयार केली ज्यादा दराने विकून नफा कमविला ? हा सदरील आरोप देखील खोटा असून त्या कालावधीत जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे संपूर्ण भारतभर दुधाचे दर कमी झाले होते साहजिकच जळगाव जिल्हा दूध संघाने देखील त्यावेळी शासन निर्णयाप्रमाणे दुधाचे दर उत्पादकांना दिले होते मात्र त्यातून झालेल्या दूध भुकटी व लोणीतून तुपातून संघाने नफा कमवला हे देखील निराधार आहे याचा सखोल अभ्यास उन्मेष पाटील यांनी करावा.
पत्रकार परिषदेत त्यांनी अमृतधारा डेरी पुसद इथून दूध खरेदी होत असल्याचा आरोप केला मात्र वस्तुस्थिती अशी आहे की जळगाव जिल्हा दूध संघाने अमृतधारा डेअरी, पुसद यांच्याकडून आजतागायत एकही लिटर दूध खरेदी केलेले नाही. याउलट संघाला अमृतधारा डेअरी, पुसद यांच्या सोबत दूध भुकटी रूपांतरण व्यवसायाअंतर्गत रू. २३,९४,१२२/- इतका अतिरिक्त उत्पन्न संघाला प्राप्त झाले आहे.
शब्दांचा खेळ करण्यात उन्मेष पाटील पट असल्याने खाजगी व सहकारी बीएमसी असा शब्द खेळ करत त्यांनी एक अजून दिशाभूलचा प्रयत्न आजच्या पत्रकार परिषदेत केला. खाजगी बी.एम.सी.ला रू. ३.७०/- अतिरिक्त दिला जातो व संस्थेस रु. ०.४७/- पैसे दिला जातो ? ही माहिती देखील अर्धवट स्वरूपाची आहे. ३.७०/- चा ठराव ३१ मार्च २०२२ म्हणजे मागील संचालक मंडळाच्या काळात झालेला आहे. त्याठरावाचे अनूमोदक उमेश पाटील यांच्या बाजूला बसलेली विद्यमान संचालक श्री. प्रमोद पांडूरंग पाटील हे आहेत.
याउलट आज ते दर कमी करून २.७०/- एव्हढे कमी झाले आहेत, तेदेखील देण्याचे कारण म्हणजे खाजगी बीएमसीला मेंटेनन्स, वीज, मनुष्यबळ, वाहतूक आदी खर्च स्वतः करावा लागत असतो, मात्र हे सर्व छुपे खर्च दुध संघाच्या सभासद संस्थेला लागत नाहीत, मागील संचालक मंडळाच्या काळात संस्थेला रू. ०.३३ इतका होता, सद्याच्या संचालक मंडळाने त्यादरामध्ये वाढ करून रु.०.४७ केला आहे.
दूध संकलन वाढले आहे मात्र संस्था कमी झाल्या आहेत ? हा देखील एक बिनबुडाचा आरोप असून दूध संकलनामध्ये वाढ होण्याचे नेमके कारण उत्पादकांची संख्या वाढल्यामुळे आहे, जनावरांची संख्या वाढल्यामुळे आहे कि आणखी कश्यामुळे याचा अभ्यास उन्मेष पाटील यांनी करावा असा खोचक टोला त्यांनी लावला आहे