भुसावळ : प्रतिनिधी
साकेगाव शिवारात नवोदय विद्यालयाच्या मागे शेतात सुमारे १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यूदेह आढळून आला होता. चार दिवस उलटूनही ओळख पटलेली नाही. त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालानुसार निष्पन्न झाले आहे. मात्र खून का करण्यात आला अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेतात मुलाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृत्यूदेहाच्या शेजारीच गुलाबी व काळ्या रंगाच्या पानाची डिझाईन असलेला शर्ट तसेच निळ्या रंगाची पॅन्ट आढळून आली आहे. याप्रकरणी तालका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनानंतर या मुलाचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हवालदार संजय भोई यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मृत बालकाची ओळख पटावी याकरिता तालुका पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागाचा परिसर पिंजून काढला. इतर पोलिस ठाण्यात बालकाच्या मिसिंगची नोंद आहे का याची माहिती जाणून घेतली आहे. मात्र अद्याप तरी बालकाची ओळख पटलेली नाही. हा मुलगा कुठून आला असेल, कुणाचा असेल, त्याचा गळा आवळून खून का करण्यात आला अशा अनेक प्रश्नांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.