जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील सुभाषवाडी येथील बद्रीसिंग पुना चव्हाण (५८) यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (१६ जुलै) सकाळी बाहेर खेळत असलेला नातू घरात पाणी पिण्यासाठी गेला, त्यावेळी ही घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बद्रीसिंग चव्हाण हे पत्नी, दोन मुले आणि सुना यांच्यासोबत राहत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी, दोन्ही मुले व सुना शेतात गेले होते. नातू आणि बद्रीसिंग चव्हाण हे घरी होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी घरात गळफास घेतला. नातू घरात आला, तेव्हा घटना उघडकीस आली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.