भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील टहाकळी फाटयावर बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे कट्याची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर वरणगाव पोलीसांनी झडप घालून दोघाना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या जवळील दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुस असे ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोघास अटक करण्यात आली.
या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील टहाकळी फाटा जवळ सार्वजनीक जागी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री होत असल्याची वरणगाव पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच सह पो निरिक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक जितेंद्र जैन व पो कॉ योगेश पाटील यांनी टाहकळी फाट्यावर रविवारी २३ जून रोजी रात्री ११:३० वाजता सापळा रचून टाहकळी फाट्यावर संशयित सागर प्रकाश डिके उर्फ सत्या रा. टहाकळी ता. भुसावळ, आकाश विष्णू सपकाळे रा. रायपूर ता. रावेर या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले.
दरम्यान त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पोलीसांना शंका आली. त्यांच्या अंगाची झडती घेतली असता त्यांच्या जवळ दोन गावठी कट्टे व जिवंत काडतूस मिळून येताच पोलीसानी त्यांच्या जाग्यावर मुसक्या आवळल्या. त्यांच्या जवळील दोन कट्टे व जिवत काडतूस असे एकूण ३४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दोघाना ताब्यात घेतले.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पो कॉ योगेश पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी सागर प्रकाश ढिके उर्फ सत्या रा. टाहकाळी, आकाश विष्णु सपकाळे रा. रायपूर ता. रावेर यांच्या विरोधात २०२४ शस्त्र अधिनियम ३/२५. ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास उपनिरिक्षक जितेंद्र जैन हे करीत आहेत.