जळगाव: प्रतिनिधी
गेल्या एक ते दीड महिन्यापासून आजीकडे आलेल्या मीना सनी राठोड (२२, रा. धानोरा, ता. जळगाव) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, ११ जून रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास जळगावातील हरिविठ्ठल नगरात घडली.
सविस्तर वृत्त असे कि, दरम्यान, ही आत्महत्या नसून विवाहितेच्या पतीनेच तिला मारले असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या मीनाचे आठ महिन्यांपूर्वीच सनी राठोड याच्याशी लग्न झाले. पती सतत मारहाण करीत असल्याने विवाहिता एक ते दीड महिन्यापूर्वी जळगावात हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या आजीकडे आली होती. काही दिवसांपूर्वीच एका खासगी डॉक्टरकडे कामाला लागली होती.
मंगळवार, ११ जून रोजी सकाळी मीना राठोडचा भाऊ मोबाइलवर संपर्क साधत होता. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने त्याच्या मित्राला पाहण्यासाठी पाठविले. त्यावेळी मित्र व त्याची आई विवाहिता राहत असलेल्या घरी गेले असता, त्यांना मीना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी विवाहितेचा भाऊ व इतरांना माहिती दिली. ते तेथे पोहोचले व विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.