भुसावळ : प्रतिनिधी
दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी विष्णू पथरोड (वाल्मीक नगर, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील पोखरणी (जि. हरदा) येथून अटक केल्याने आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. अटकेतील विष्णू पथरोडला शुक्रवारी दुपारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याला १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोर बुधवारी २९ मे रोजी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कारमधून जात असलेले माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी विनोद चावरिया, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, किरण कोळी व करण पथरोडला यांना अटक केली आहे. चारही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर हत्याकांडप्रकरणी संशयित विष्णू पथरोड यास मध्य प्रदेशातील पोखरणी (जि. हरदा) येथून जळगाव गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यास शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी ७ रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.