भुसावळ : प्रतिनिधी
रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ५९ दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही कारवाई आहे.
सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून भुसावळ विभागातून उन्हाळी विशेष अशा १०६ प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या काळात तर तिकिटांचा अधिकच काळाबाजार होतो. त्यामुळे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध रेल्वे विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ५९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ विभागाच्या डीआरएम इती पांडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, प्रवाशांनी एजंटांना जादाचे पैसे मोजून तिकिटे खरेदी करू नयेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे