भुसावळ : प्रतिनिधी
येथील बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुक्ताईनगर येथून दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भरत शालिग्राम बोंडे यांची दुचाकी ४ मे रोजी घरासमोरून चोरीस गेली होती. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पो.हे.कॉ. विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, पोलीस नायक सोपान पाटील, राहुल वानखेडे, सचिन चौधरी, जावेद शहा यांचे पथक नेमण्यात आले होते.
या पथकाने एका संशयित आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या पथकाने मुक्ताईनगर येथील गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या किरण उर्फ करण शालिग्राम पाटील (वय २५) यास ५ मे रोजी ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत तीन, जळगाव जिल्हा पोलीस स्टेशन हद्दीतील एक व मलकापूर सिटी पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अशा ५ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यात आरोपीने चोरी केलेल्या प्लॅटीना, हिरो होन्डा शाईन, एच एफ डिलक्स या प्रकारच्या पाच दुचरर्का बाजार पेठ पोलीसांनी जप्त केल्या आहेत.