जळगाव : प्रतिनिधी
ऊरुस व संदल कार्यक्रमात झालेल्या वादातून बुधवारी पहाटे साडेतीन वाजता गेंदालाल मिल परिसरात सुमारास बाबूराव उर्फ भिकन शेख (रा. गेंदालाल मिल) याने हवेत दोन राऊंड फायर केले. या घटनेमुळे शहरात खळबळ माजून गेली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात नशिराबाद येथून गोळीबार करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याचयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गेंदालाल मील परिसरात अली सैय्यद रज्जाक हे भंगार विक्रेता वास्तव्यास आहे. दि. ५ मे रोजी गेंदालाल मिलपरिसरात बाबा मौला अली मौला यांचा ऊरुस व संदलचा कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमात बॅनरवर अली सय्यद रज्जाक यांच्या मुलाचे व त्यांच्या ग्रुपचे नाव न टाकल्याच्या कारणावरुन अली सय्यद रज्जाक यांचा मुलगा कासीम याचा बाबूराव उर्फ अस्लम भिकन शेख यांच्यासोबत वाद झाला होता. बुधवार दि. ८ मे रोजी अली सय्यद रज्जाक यांचे कुटुंबिय घरात झोपलेले असतांना, पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजावर दगडफेकत असल्याचा त्यांना आवाज आला.
हवेत दोन राऊंड फायर केल्यानंतर बाबूराव उर्फ अस्लम याने अली सैय्यद यांना मेरे नाद मे लगे तो जिंदा नही छोडूंगा अशी धमकी देखील दिली. यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नगरसेविकास रुक्सानाबी यांनी बाबूराव उर्फ अस्लम याला क्या कर रहा है फायरिंग कर रहा है क्या असा आवाज दिल्यानंतर तो तेथून पसार झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या फायरगिंमुळे कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजून गेली होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणाहून फायरिंग झालेल्या रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
फायरिंग केल्यानंतर बाबुराव उर्फ अस्लम भिकन शेख हा तेथून पसार झाला. तो नशिराबाद येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, योगेश पाटील, सुधीर साळवे, रतन गिते, अमोल ठाकूर यांच्या पथकाने अवघ्या काही तासातच बाबूराव उर्फ अस्लम भिकन शेख याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून फायरिंग केलेले गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.