जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसी एरियातील डी-सेक्टरमधील मोरया केमिकल कंपनीला १७ एप्रिल रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत ५ जणांचा मृत्यू तर २२ जखमी होते. आता मृतांचा आकडा अजून वाढला असून एका जखमी तरुणाचा ऐन कामगारदिनीच, बुधवारी उपचारादरम्यान शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चंद्रकांत लक्ष्मण पाटील (वय २७, रा. किरवाडा, पो. साकळी बोराडे, जि. धुळे) असे मृत कामगाराचे नाव आहे. मोरया कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेत चंद्रकांत हा ७० टक्के भाजला गेला होता. गेल्या १५ दिवसांपासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
अखेर बुधवारी सकाळी ११:४२ वाजता त्याचा मृत्यू झाला. मयत कामगाराच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मोरया कंपनीत गेल्या काही वर्षांपासून तो काम करीत होता. एमआयडीसी पोलिस स्टेशनला पीएसआय दीपक जगदाळे यांनी मृत्यूची नोंद केली आहे. या आगीत समाधान नारायण पाटील, रामदास घाणेकर, किशोर चौधरी, दीपक सुवा, सचिन चौधरी या पाच जणांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे.