जळगाव : प्रतिनिधी
शहरातील प्रताप नगर परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या एकुलत्या एक २६ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. तेजस सतीश नारखेडे (वय २६) असे मृत युवकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तेजस हा प्रतापनगर भागात वास्तव्यास होता. तेजसचे वडिल सतीश नारखेडे यांचे प्रतापनगरातच हॉटेल आहे. हॉटेल व इतर काम तेजस सांभाळत होता. गुरुवारी त्यांच्याकडे काही नातेवाईक आले होते. नातेवाईकांच्या लहान मुलांसोबत तेजस घरातच रमला होता. जेवण झाल्यानंतर तो झोपायला गेला. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास तेजसची अचानक तब्येत बिघडली. तेजसला घरीच उलटी झाल्यानंतर तो बेशुध्द पडला. घरच्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले, खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून, तेजसला जीएमसीत दाखल केले. याठिकाणी सीएमओ सुशांत निकुंभ यांनी प्राथमिक तपासणी केली. मात्र, त्याआधीच तेजसचा मृत्यू झाला.