रावेर: प्रतिनिधी
लगतच्या मध्य प्रदेशातील ब-हाणपूर येथून महाराष्ट्रात एक लाख रुपयांच्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या पारोळा येथील एका वृद्धाला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने येथे मुद्देमालासह पकडले. यातील आरोपीला अटक केली आहे. १६ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हे. कॉ. ईश्वर चव्हाण, पो. कॉ. प्रमोद पाटील, पो. कॉ. सचिन घुगे, पो. कॉ. विशाल पाटील पो कॉ महेश मोगरे यांचे पथक गस्त घालत असताना रावेर शहरातील बसस्थानकात झाडाखाली बसलेला एक वृद्ध व्यक्ती पोलिस वाहन पाहताच दचकला. त्याची संशयास्पद हालचाल पाहताच त्याच्याजवळील पांढऱ्या रंगाच्या रेक्झीनच्या गठ्ठयांची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला १ लाख ३ हजार ५०० रुपये किमतीचा गुटखा आढळला. हा गुटखा तो पारोळा येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे उघडकीस आले. ही घटना १६ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या समारास उघडकीस आली. यातील आरोपीचे नाव रमेश रूपचंद पाटील (वय ७४, रा. शनि मंदिराजवळ, पारोळा) असे आहे. बऱ्हाणपूर येथील प्रीतेश शेठ यांच्याकडून तो खरेदी केल्याचे त्याने सांगितले. आरोपीकडून मुद्देमाल जप्त करून पो. कॉ. विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ करत आहेत