जळगाव : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील सातपुडा भागात पोलिसांसह वनविभागाच्या पथकाने ५ वटवाघळांची तस्करी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मध्य प्रदेशातील असून त्याची व्हॅनही जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भारसिंग ग्यानसिंग बारेला (गुलझिरी, पो. पाडल्या बोरवाल, जि. खरगोन) असे या आरोपीचे नाव आहे. एम.पी.०९-बीसी-४९३८ या व्हॅनने तो पाच जिवंत वटवाघळांची तस्करी करीत होता. तशातच वैजापूर वनविभागाचे व चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना त्यांच्या नजरेस व्हॅन पडली. त्यांनी व्हॅन रोखली. तपासणी केल्यावर वाहनामध्ये पाच जिवंत वटवाघूळ आढळून आले. या पथकाने वटवाघळांसह वाहन ताब्यात घेतले आणि आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, वन्यजीव संरक्षण सुधारणा विधेयक २०२२ अनुसूची २ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
चोपडा न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे, ही कारवाई उपवनसंरक्षण जमीर काझी, विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर कक्षाचे सहायक वनसंरक्षक एस.एम. सोनवणे, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह सहकाऱ्यांनी केली.