जळगाव : प्रतिनिधी
मारहाण व दमदाटी करीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडील 14 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल लूटण्यात आल्याची घटना 3 रोजी रात्री मेहरुणजवळील जे.के.पार्कजवळ घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत कुविख्यात गुरूजीतसिंग सुजाणसिंग बावरीसह महेश संतोष भोई, समीर राजू तडवी (22, अजमेरी गल्ली, तांबापुरा, जळगाव) यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी गुरूजीतसिंग हा कुविख्यात आरोपी असून त्याच्याविरोधात तब्बल 17 गुन्हे जबरी लूट व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने चौकशीदरम्यान मेहरुण परिसरातून तीन दुचाकींची चोरी करीत या दुचाकी मेहरुण तलावात टाकल्याची कबुली दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिव कॉलनीतील रहिवासी कुणाल विजय सोनार (वय २२) या तरुणाला चौकडीने मारहाण करीत त्याच्याकडील चांदीचे ब्रेसलेट, मोबाईल व 950 रुपयांची रोकड हिसकावली होती. 3 रोजी रात्री नऊ वाजता मेहरुण जवळील जे.के.पार्कजवळ लुटीची घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत बावरी व त्याच्या अन्य तीन साथीदारांना निष्पन्न करीत बेड्या ठोकल्या.
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशो नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार किरण पाटील, कॉन्स्टेबल राहुल रगडे, विशाल पाटील, सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंडे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.